Ephesians 6

1मुलांनो, प्रभूमध्ये आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे योग्य आहे. 2
This verse is empty because in this translation its contents have been moved to form part of verse Eph 6:3.
In this translation, this verse contains text which in some other translations appears in verses Eph 6:2-Eph 6:3.
3“आपल्या वडिलांचा व आईचा मान राख, यासाठी की तुझे सर्वकाही चांगले व्हावे व तुला पृथ्वीवर दीर्घ आयुष्य लाभावे.” अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे.

4आणि वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका पण तुम्ही त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.

5दासांनो, तुमच्या अंतःकरणाच्या प्रामाणिकतेने जशी ख्रिस्ताची आज्ञा पाळता तशी पूर्ण आदराने व थरथर कांपत जे देहानुसार पृथ्वीवरील मालकांशी आज्ञाधारक असा. 6मनुष्यास संतोषवणाऱ्या सारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे तर मनापासून, देवाची इच्छा साधणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांसारखे आज्ञांकित असा, 7ही सेवा मनुष्याची नाही तर प्रभूची सेवा आहे अशी मानून ती आनंदाने करा, 8प्रत्येक व्यक्ती जे काही चांगले कार्य करतो, तो दास असो अथवा स्वतंत्र असो, प्रभूकडून त्यास प्रतिफळ प्राप्त होईल.

9आणि मालकांनो तुम्ही, त्यांना न धमकावता, तुमच्या दासाशी तसेच वागा, तुम्हास हे ठाऊक आहे की, दोघाचाही मालक स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.

ख्रिस्ती मनुष्याची शस्त्रसामग्री

10शेवटी, प्रभूमध्ये बलवान होत जा आणि त्याच्या सामर्थ्याने सशक्त व्हा. 11सैतानाच्या कट-कारस्थानी योजनांविरुद्ध उभे राहता यावे, म्हणून देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा.

12कारण आपले झगडणे रक्त आणि मांसाबरोबर नाही, तर सत्ताधीशांविरुद्ध, अधिकाऱ्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या अधिपतीबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्याविरुद्ध आहे. 13या कारणास्तव वाईट दिवसात तुम्हास प्रतिकार करता यावा म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्त्रसामग्री घ्या. म्हणजे तुम्हास सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल

14तर मग स्थिर उभे राहा, सत्याने आपली कंबर बांधा, नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा. 15शांतीच्या सुवार्तेसाठी तयार केलेल्या वहाणा पायात घाला. 16नेहमी विश्वासाची ढाल हाती घ्या, जिच्यायोगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवू शकाल, ती हाती घेऊन उभे राहा.

17आणि तारणाचे शिरस्राण व आत्म्याची तलवार, जी देवाच वचन आहे, ती घ्या, 18प्रत्येक प्रार्थना आणि विनंतीद्वारे सर्व प्रसंगी आत्म्यात प्रार्थना करा आणि चिकाटीने उत्तराची वाट पहा व सर्व पवित्र जनांसाठी प्रार्थना करीत जागृत राहा.

19आणि माझ्यासाठी प्रार्थना करा, जेव्हा मी तोंड उघडीन तेव्हा मला धैर्याने सुवार्तेचे रहस्य कळवण्यास शब्द मिळावे, 20मी, त्यासाठीच बेड्यांत पडलेला वकील आहे, म्हणजे मला जसे त्याविषयी बोलले पाहिजे तसे धैर्याने बोलता यावे.

समाप्ती

21पण माझ्याविषयी, म्हणजे मी काम करीत आहे ते तुम्हास समजावे म्हणून, प्रिय बंधू आणि प्रभूमधील विश्वासू सेवक तुखिक या सर्व गोष्टी तुम्हास कळवील. 22मी त्यास त्याच हेतूने तुमच्याकडे धाडले आहे; म्हणजे तुम्हास माझ्याविषयी कळावे आणि त्याने तुमच्या मनाचे सांत्वन करावे.

23देवपिता आणि प्रभू येशू ख्रिस्तापासून आता बंधूंना विश्वासासह प्रीती आणि शांती लाभो. 24जे सर्वजण आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर अविनाशी प्रीती करतात, त्या सर्वाबरोबर देवाची कृपा असो.

Copyright information for MarULB